Tuesday, September 7, 2010

साम्राज्य स्वप्नाची सुवर्णपहाट !

मराठेशाहीच्या इतिहासामध्ये जर मराठा साम्राज्य या संज्ञेचा जनक आणि या स्वप्नाचा साकरता कोण असा सवाल उपस्थित झाला तर याचे निर्विवाद एकच उत्तर असेल -  श्रीमंत थोरले बाजीराव बल्लाळ पेशवे साहेब उर्फ ” राउ“.राउंचे पाळण्यातील नाव विसाजीपंत, ह्यांचा उल्लेख कागद पत्रातून राउ/राया/पंडत असा येतो. राउच्या कारकीर्दीची सुरुवात म्हणजे मराठा स्वराज्याची साम्राज्यात रुंपांतरित होणाऱ्या एका सुवर्णपहाटेची सुरुवात. 
शाहू महाराज १७०७ ला  औरंगझेबाच्या कैदेतून सुटून आले तेव्हा महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. शाहू महराज व ताराबाई यांच्यामध्ये स्वराज्याच्या राजगादीसाठी संघर्ष सुरु होता.
छत्रपती संभाजी राजांचे पुत्र म्हणून शाहू महाराजांना बऱ्याच मातब्बर सरदारांचा पाठिंबा होता. पण त्याच वेळी ७ वर्षे औरंगाझेबाबरोबर कडवी झुंज देणाऱ्या ताराराणी  साहेबांच्या पक्षातही मुत्सद्दी तसेच रणझुंजार मराठ्यांचा भरणा होता. त्याच काळात शाहू महाराजांच्या पक्षात एका मुत्साद्द्याचा उदय झाला ते म्हणजे कोकणातील श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट होत. त्यांनी सिद्द्यांच्या जाचाला कंटाळून श्रीवर्धन सोडले आणि ते देशावर आले. तेथे त्यांनी शंकराजी नारायण सचिव, रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधव यांचेकडे चाकरी केली. परंतू शाहू महाराजांच्या पक्षात आल्यानंतर आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी पुढील वाटचाल सुरु केली. शाहू महाराजांनी त्यांना “सेनाकर्ते” ही पदवी देऊन भूषविले. त्यांची पुढे पेशवे पदावर नियुक्ती झाली. शाहू महाराजांवर खूप आणीबाणीचे प्रसंग येऊनही बाळाजी विश्वनाथांनी त्यांची बाजू कधीही सोडली नाही.
कान्होजी आंग्रे हे ताराबाई साहेबांच्या पक्षातील एक वजनदार नाव होते. मराठ्यांच्या आरमाराचे ते प्रमुख अर्थात सरखेल होते. कोकणातील असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्र्यांचा घरोबा होता. कान्होजी आंग्र्यांनी शाहू महाराजांच्या बहिरोपंत पेशव्यास तसेच निळो बल्लाळ या चिटणीसास राजमाची किल्ल्यात कैद करून ठेवले. लोहगड, राजमाची काबीज केले होते.त्यावेळी बाळाजी विश्वनाथ ३ ते ४ हजार फौज घेऊन लोहगडाजवळ आले. आंग्रे ओलावण येथे पेशव्यांना भेटले. तेथे बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी अंग्रे यांना ८ फेब्रु १७१४ रोजी शाहू महाराजांकडून सरखेल पद देऊ केले आणि समेट घडवून आणला. पुढे दिल्लीला धडक देऊन स्वराज्याच्या सनदा, चौथाई चे हक्क तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे महाराणी येसूबाई साहेब यांची सुटका करणारा हा पेशवा १७२० च्या मार्च महिन्यात सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावला.
पुढे शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले. त्यावेळी दरबारात बरेच जुने जाणते पोक्त मुत्सद्दी होते, पण शाहू ने आपल्या स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण, रणझुंजार होता. तसेच बाळाजी विश्वनाथांच्या तालमीत तयार झालेला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला.
१८ व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. बाजीराव याच काळात लहानाचा मोठा झाला. वडिलांबरोबर दिल्ली स्वारीवर बाजीराव गेला तेव्हा तो अवघा १८/१९ वर्षांचा होता. त्यावेळी दिल्लीतील मुघलांच्या साम्राज्याची अवस्था तसेच तेथील विस्कळीत परिस्थिती बाजीरावांनी खूप जवळून पहिली. लेखन, वाचन, हिशेब, घोड्यावर बसणे, कसरत, भालाफेक, तलवारबाजी यात ते तरबेज झाले होते. त्यांना पेशवेपद देऊ नये असा सल्ला दरबारातील वरिष्ठांनी शाहू महाराजांना दिला होता परंतू बाळाजी विश्वनाथ यांनी जीवादाराभ्या श्रम साहस करून,पुढे सुख भोगिले नाहीयाज करिता त्यांस वस्त्रे तूर्त देतोयांचे दैवी असल्यास श्री शंभू कृपा करीलउपयोगी नाही असे दिसल्यास पुढे विचार होईल.” असे उत्तर देऊन बाळाजी च्या मृत्यू नंतर १५ दिवसांनी, चैत्र बहुल सप्तमी, गुरुवार, शके १६४२ दिनांक १७ एप्रिल १७२०, रोजी कराड नजीक मसूर मुक्कामी शाहू महाराजांनी थोरले बाजीराव यांस पेशवाईची वस्त्रे दिली.
वीराला रणांगणात धैर्य आवश्यक असते, तसेच सेनापतीला शत्रूचे बळ, युद्धनिपुणता, सैन्याचे मनोबल या सर्वाची निट माहिती असणे गरजेचे असते. याचबरोबर खऱ्या सेनानीला रणक्षेत्राची भौगोलिक रचना लढाई जिंकण्याच्या दृष्टीने माहित असणे आवश्यक असते. भौगोलिक परिस्थितीचा शत्रूला अडचणीत आणण्याकरिता योग्य उपयोग करून घेणे ही एक कलाच आहे. ज्याप्रमाणे स्वराज्यावर चालून आलेल्या गनिमांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकाव्याने वारंवार धूळ चारली. पुढे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन छत्रपती संभाजी महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आदी वीरांनी शत्रूला सळो का पळो करून सोडले. अगदी तशाच प्रकारे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी युद्धनीती वापरून शत्रूला रणांगणावर चीत केले. आपल्याला अनुकूल अशा रण क्षेत्रात शत्रूला येण्यास भाग पडून तेथे त्याचा पराभव करणे हे बाजीरावांचे युद्धतंत्र होते. म्हणूनच २० वर्षांच्या कारकिर्दीत लहान मोठ्या अशा एकूण ३६ लढाया होऊनही त्यांना कधीच पराभव पत्करावा लागला नाही. किंबहुना निजाम, मुघल तसेच माळवा, बुंदेलखंड, राजस्थान, उत्तर भारत या प्रांतांमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा राहिला.
बाजीरावांनी  निजामाला पराभूत केलेच पण दिल्लीवरही धडक देऊन मराठी सैन्याचा हिसकाही दाखवला. त्यांनी आपल्या भोवती शिंदे, होळकर, पवार इत्यादी तरुण तडफदार सरदारांचे वलय निर्माण केले, त्यातूनच पुढे या सरदारांचा उदय आणि उत्कर्ष झाला. इतका पराक्रम, सैन्यबळ असूनही कधीही सत्तेची लालसा या पेशव्यांनी बाळगली नाही. साताऱ्याच्या गादीवरील छत्रपती शाहू महाराजांच्या चरणाशी इमान राखून त्यांनी संपूर्ण भारतवर्षात पराक्रम गाजवला आणि विजयी झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला त्यांनी साम्राज्याचे स्वरूप आणले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मराठ्यांच्या पराक्रमाला महाराष्ट्राबाहेर नेणारा हा एक अपराजित योध्दा म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेले.
  • संदर्भ:
- मराठी रियासत खंड ३.             गो. स. सरदेसाई
- प्रतापी बाजीराव.                     म. श्री. दिक्षित
- पेशवा  पहिला बाजीराव.          श. श्री. पुराणिक
- मराठ्यांचा युद्धेतीहास.             ब्रिगेडीअर पित्रे

3 comments:

  1. Jai Maharashtra.........

    he waachun chaar oli lihawyaashya watalyaat

    "Dhanush haati amuchya ramache,
    bhawani shiwabhaachi talawaar...
    Parat ekada rowu jhende atakechya hi paar.."

    http://ransangram.blogspot.com

    ReplyDelete
  2. http://raigad.wordpress.com/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A5%A7/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0/

    Copy Paste ?

    ReplyDelete