Thursday, November 18, 2010

शिवशाहीतील अज्ञाताचा शोध - जिंतीकर भोसले




शिवाजी महाराजांचे थोरले बंढू म्हणजेच शहाजीराजे व मातोश्री जिजाबाई यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांच्या विषयीचे अनेक गैरसमज इतिहासकारांनी लिहिलिल्या बखरीत सापडतात. संभाजीराजांची शाखा, त्यांचे घराणे यामुळेच अज्ञात 
राहिले आहे. शिवशाहीतील अज्ञात शोध.

छत्रपती शिवाजीमहाराज हे तमाम मराठी मनाचे श्रद्धास्थान आहे. छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या शाखेबरोबरंच तंजावरच्या भोसले घराण्याचीदेखील महाराष्ट्राला ओळख आहे. परंतु महाराष्ट्रातच असणारी छत्रपतींचे थोरले बंधू संभाजीराजे यांची शाखा महाराष्ट्राला पूर्णपणे अज्ञात आहे, याचे कारन म्हणजे हे संभाजीराजे अल्पवयातंच मारले गेले असा एक समज इतिहासाकारांनी करून घेतला, त्यामुळे हे घराणे व त्यांचे कर्तुत्व कायम अज्ञातंच राहिले. मोठ-मोठया इतिहासाकारांनीदेखीला या घराण्याचा परामर्ष घेतला नाही, बखरकारांनी अज्ञानातून जे चित्र रेखाटले त्यामुळे या घराण्याचा फारसा विचार झाला नसून, काही माहिती पुढे आली, तीदेखील चुकीची ठरली.

शहाजीराजे आणि मातोश्री जिजाबाई याचे संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, ‘राधामाधवविलासचंपू’ कर्त्या जयरामने या संभाजीराजांचा उल्लेख ‘ युवराज संभाजीराजे’ असा केलेला आहे. मराठयांच्या इतिहासात प्रमाण मानल्या गेलेल्या सभासदाने आपल्या बखरीत या संभाजीराजांच्या जन्माचा उल्लेखदेखील केलेला नाही; फक्त अफजलखान प्रकरणात शिवाजी महाराजांच्या तोंडी या संभाजीराजांच्या मृत्युचा उल्लेख सभासद करतो.

चित्रगुप्त, एक्क्याण्णवकलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बकर, शेदगावकर भोसले बखर, श्री शिवदिग्विजय, शिवाजीप्रताप यामध्ये या संभाजीराजांचाअ उल्लेख आलेला आहे. याबरोबर बृहदीश्वर शिलालेखात काही माहिती विस्ताराने सापडते. परमानंदाने आपल्या शिवभारतात शहाजीला जिजाऊपासून सहा शुभलक्षणी पुत्रझाले. त्यापैकी शंभू व शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले असा उल्लेख केलेला आहे. फारसी साधनात बादशहानाम्यात संभाजीराजांचा उल्लेख दोन हजारी मनसबदार असा दिसतो. संभाजीराजांचा बहुतेक काळ कर्नाटकात गेल्याने महाराष्ट्राशी त्यांचा संबंध आला नाही. त्यामुळे नंतरच्या काळारदेखील मराठयांच्या इतिहासात त्यांचे उल्लेख आढळत नाहीत व अज्ञाताचे हे गूढ वाढतंच जाते.
एक्क्याण्णवकलमी बखरीत संभाजीचा पुत्र उमाजी याचा उल्लेख एकदा आलेला आहे. याशिवाय अन्य बखरकारांनी संभाजीराजांच्या पुत्रांचा उल्लेख केलेला नाही. परमानंदानेदेखील शिवभारतात संभाजी व जयंतीबाई यांच्या विवाहाविषयी विस्ताराने लेखन केले असले तरी त्यांच्या मुलाविषयी मौन पाळलेले आहे. शेडगावकर भोसले बखरीत तर ‘त्यांच्या पोटी संतान नाही’ असा उल्लेख सापडतो.

बृहदीश्वर शिलालेखात संभाजीराजांचा पुत्र उमाजीचा स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे. त्याचबरोबर उमाजीचा मुलगा परसोजी याचा जन्म झाल्याची नोंद या शिलालेखात सापडते. याशिवाय अफजलखान-वधाच्या पोवाडयात उमाजीचा उल्लेख आलेला आहे. उमाजीचा या पोवाडयामधील उल्लेख थेट संभाजीचा पुत्र असा जरी नसला तरी ‘पुतण्या उमाजी राजाला’ (म्हणजे शिवाजी राजांना) असा आलेला आहे. बृहदीश्वर शिलालेखानुसार संभाजीला जयंतीबाईखेरीज गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा आणखी दोन स्त्रिया असल्याची माहिती मिळते, उमाजी हा संभाजीराजांचा दत्तक पुत्र नव्हता हे जेधेशकावलीमधल्या नोंदीवरून सिद्ध होते. जेधेशकावलीमध्ये उमाजीचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ ला झाला अशी नोंद मिळते. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचा होता.
उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हा आपल्या समशेरीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उअमाजीला बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्याचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे.

‘मालोजी भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.

उमाजीशिवाय संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे मानडी साधनात मिळतात. मराठी साधनात मात्र यांचे उल्लेख नाहीत. उमाजी या एकाच संभाजीपुत्राचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध आला, त्याची शाखा महाराष्ट्रार विस्तारली म्हणून त्याची काही माहिती मराठयांच्या इतिहासात मिळते.

संभाजीराजांची पत्नी जयंतीबाई हिचेच दुसरे नाव मकाऊ होते असा गैरसमज काही इतिहासकारांच्या लेखनामुळे रुढ झालेला आहे. ऐतिहासिक वंशावळीमध्येदेखील मकाऊ ही संभाजीराजांची पत्नी असल्याचा उल्लेख येतो. ही वंशावळ इनाम कनिशनपुढे ग्राह्य ठरलेली आहे. वास्तवात गोष्ट अशी की, जयंतीबाई ही विवाहानंतर संभाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात कोलारप्रांती गेली ती अखेरपर्यंत तिकडेच होती. संभाजीराजांच्या मृत्युनंतरदेखील कोलार तालुक्यात जयंतीबाईंनी केलेल्या दान व बक्षिसाचे पुरावे ही बाब सिद्ध करतात. जयंतीबाईंनी दान केल्याचा अखेरचा शिलालेक्ह हा इ.स.१६९३ चा आहे. म्हणजेच जयंतीबाई या १६९३ पर्यंत हयात होत्या व त्या कर्नाटकात वास्तव्य करून होत्या हे ठामपणाने सांगता येते. दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ.स १७४० पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसतात. त्यांची समाधीदेखील जिंती या गावी आहे. यावरून जयंतीबाई व मकाऊ या दोघी एक नव्हेत हे सिद्ध होते. सासू आणि सून यांची बखरकारांनी गल्लत केलेली आहे. मकाऊ ही उमाजी भोसले याचीं पत्नी होती. यांस बहादूरजी नावाचा पुत्र होता, परंतु त्याच्यानंतर मकाऊने भांबोरेकर भोसले घराण्यातील परसोजी हा दत्तक घेतला. हा परसोजी म्हणजे शहाजीराजांचा चुलतभाऊ परसोजी यांचा पणतू, यांच्यापासून जिंतीकर बोसले घराण्याचा वंश पुढे वाढला. 
  
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या वंशाचा इतिहास असा आहे. भोसले घराण्याची जी पाटीलकीची गावे वंशपरंपरागत आलेली होती त्यापैकी जिंती हे एक होते. बादशाही कागदपत्रात मकाऊचा उल्लेख मकुबाई पाटलीण जिंतीकर असा येतो. नात्याने मकुबाई शाहू महाराजांची चुलत चुलती लागत होती. त्यांचा स्नेह शाहू दप्तरातील कागदपत्रांतून वारंवार दृष्टीस पडतो. शाहूने वेळोवेळी आपल्या या चुलतीचा परामर्ष घेतल्याचे दिसते. मकाऊस काही अडचण आल्यास ती निवरण करण्याचे आदेश शाहूने आपल्या कमाविसदारास दिलेले दिसतात. शाहू छत्रपती मोगलांचे कैदेत असताना छत्रपती राजारामने मकाऊस धनाजी जाधवाकडून एक गाव दिल्याची नोंद ताराबाईकालीन कागदपत्रात सापडते.

इ.स.१७३० च्या सुमारास मोगलांचा करमाळा येथील बंडखोर सरदार राजा रावरंभा निंबाळकर याने जिंती गावास व मकाऊस काही उपद्रव केला. त्या वेळी बादशहाने निंबाळकरास मकाऊस उपद्रव न करण्याची तंबी दिल्याचे पत्र जिंती दप्तरात पहावयास मिळते. इ.स.१७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापदतात. आपळ्या आदर्श कारभाराने मकाऊ देवत्वास पोहोचली. आज जिंती गावात तिचा उल्लेख मकाई असा केला हातो. ग्रामस्थ तिला देवी मानतात व दरवर्षी तिची जत्रा भरते.

सोलापूर, पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणार्‍या जिंती गावात आजही मकाऊचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे, त्यात संभाजीराजांच्या या शाखेचे विद्यमान वंशज राहतात. वाडयाच्या तटाची बरीच पडझड झालेली आहे, परंतु सतराव्या शतकातील वैशिष्टये दाखविणारे महाद्वार अजून चांगल्या अवस्थेत आहे. चिरेबंदी असणार्‍या या महाद्वारावर वरच्या बाजूल लाकडातंच सुबक अशी गणेशपट्टी  कोरलेली आहे. या मधील गजानन हा ऋद्धीसिद्धीसहित असून उजव्या सोंडेचा आहे.  बाजूला दोन्हीकडे सुबक अशी वेलबुट्टी  कोरलेली आहे. गणेशपट्टीच्या वर असणारा भाग हा पातळ विटांत बांधलेला असून विटांमध्ये नक्षीकाम केलेले आहे.
वाडयाच्या अंतर्भागात मोठी पडझड झालेली असून आतील सर्व बांधकाम काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. वाडयाच्या खालच्या भागात असणारे भुयार मात्र अगदी चांगल्या अवस्थेत आहे. याची उंची साधारणत: सात-साडेसात फूट एवढी आहे. याचे बांधकाम अगदी चिरेबंदी असे आहे. यात आत उतरण्यास दोन्ही बाजूंनी जिने आहेत. या भुयाराच्या भिंतीमध्ये कोनाडे काढलेले असून त्यामध्ये खजिन्यासाठी रांजण बसविलेले आहेत.

जिंती गावच्या शेजारी एका चौथार्‍यावर या गावची पाटलीण मकूबाई भोसली जिंतीकर उपाख्य मकाईची एक छोटेखानी अशी समाधी आहे. एवढीच आज या गावात मकाऊची स्मृती आहे. दरवर्षी येथेच यात्रा भरते. गावातले आणि आसपासची काही बांधकामे सतराव्या शतकाची वैशिष्टये बाळगून आहेत. मराठयांच्या इतिसात जिंती गाव आणि जिंतीकर भोसले घराणे यांची फारशी दखल घेतली गेलेली नाही, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.

शिवछत्रपतींचे थोरले बंधू संभाजीराजे हे आदिलशाही मनसबदार होते. कर्नाटकात शहाजीराजांचे व त्यांचे वास्तव्य हे एखाद्या स्वतंत्र राजासारखे होते, परंतु महाराष्ट्रात असणार्‍या त्यांच्या वंशजांनी मोगली मनसबदारातंच धन्यता मानली. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘स्वराज्य, स्वराष्ट्र व स्वधर्म’ ही कल्पना महाराष्ट्रातील त्यांच्या आप्तांच्या देखील पचनी पडू शकली नाही. तंजावरकर भोसल्यांच्या प्रमाणेच जिंतीकर भोसलेदेखील याला अपवाद ठरू शकले नाहीत. त्यामुळेच इतिहासाच्या अडगळीतंच गेली. महाराष्ट्रात ही शाखा असूनदेखील ती आज अशी अज्ञातात आहे. (लेखन-छायाचित्रण- अनिरुद्ध बिडवे)

2 comments:

  1. Thanks for sharing this information.
    Keep up the good work.

    ReplyDelete
  2. Get free details of 3 BHK, 2 bhk flats in Aurangabad (Sambhajinagar) Maharashtra within your budget

    ReplyDelete